ताज्या घडामोडी

अनाथ दिशाला मिळणार पालकांची दिशा…

 

जन्मतः निराधार झालेली दिशा. आणि हा अन्याय कमी होता की काय म्हणून निसर्गाने तिच्यावर अंधत्वही लादले. भविष्याची कुठलीही आशा नसल्याने चाचपडत तिची वाटचाल सुरू होती. तिचे अनाथपण संपुष्टात आणले ते अजिंक्य व वैष्णवी या बहिणभावानी! दिशाच्या आयुष्याची पुढील दिशा उजळून काढण्याची जबाबदारी अंगावर घेणाऱ्या या दोघांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

राष्ट्रपुरुष वीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीदिनी अजिंक्य आणि वैष्णवी सिसोदिया यांनी दिशाचे पालकत्व स्वीकारले. नाशिक येथील पोलिस टुडे या वृत्तपत्राचे संपादक असलेले रत्नदीप सिसोदिया यांची ती मुले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या या दोघांना अशा जबाबदाऱ्या घेण्याचा जणू छंदच आहे. वाढदिवसाचा आनंद अनाथ, दिव्यांगासोबत साजरा करणे, मित्रमैत्रिणीना सोबत घेऊन अनाथाश्रमात वेगवेगळे उपक्रम राबवणे अशी स्वतःच्या मार्गाने त्यांची समाजसेवा सुरू असते. याच प्रवासात त्यांना दिशाची ओळख झाली. अनाथपण आणि अंधत्व या दोन्ही प्रचंड मोठ्या उणिवांचा हसतखेळत सामना करत पाचवीच्या वर्गात शिकणारी दिशा आपल्या कुटुंबाचा घटक व्हायला हवी हे दोघांनी मनावर घेतले. ती बाब आईवडिलांच्या कानी घालून त्यांची संमती मिळवली.

महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य साधून सिसोदिया कुटुंबाने दिशाचे पालकत्व स्विकारले. तिच्या यापुढील सर्व खर्चाचा भार सिसोदिया परिवार उचलणार आहे. राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला मिरवणूक, सोहळे करून लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याऐवजी युवा पिढीच्या प्रतिनिधींकडून जर अशी निस्वार्थ सामाजिक कर्तव्ये पार पडतील तर समाजात कोणीच दुःखी राहणार नाही अशा प्रतिक्रिया देत समाजबांधवांतून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.

कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close