धुळवडीची भांगचित्रे आणि शिरपूरचा न केलेला फेरफटका

दैनिक राष्ट्रउदय व पोलिस टू डे परिवार कडून
होळी स्पेशल

खरंतर यंदाची आमची होळी संतापातच गेली. होळीसाठी लाकडं आणि गोवर्‍या मागायला गेलो तर पदरी निराशाच पडली. लोकांना या दोन्ही वस्तूंविषयी अल्पज्ञान होते. लाकडांचा उपयोग फक्त स्मशानात केला जातो आणि गोवर्‍या फक्त खेडेगावातच थापल्या जातात अशी ज्यांची समजूत आहे, अशा लोकांकडून आम्हाला काय प्रतिसाद मिळणार ? त्यामुळे यंदा केरकचरा जाळून पर्यावरणपूरक होळी करु असा नाईलाजात्मक निर्णय आम्ही घेतला. सुदैवाने आणि नगर पालिकेच्या मेहरबानीने शहरात कचर्‍याला तोटा नव्हता. निमझरी नाक्याच्या पुलापुढेच आम्हाला कचर्‍याचा इतका मोठा ढीग सापडला की शहरातल्या पन्नासावर होळ्या त्यावरच पेटवता आल्या. होळी तर झाली, पण बोंबा मारायला मिळाल्या नाहीत. कारण आमच्याच नावाने बोंब मारणार्‍यांची संख्या इतकी जास्त होती की आमचा घसा आपसूकच कोरडा पडला. मग चिडणार नाहीतर काय ?

मग कोणीतरी समजावले, की खरी मजा धुळवडीत असते. होळीच्या बोंबा ठोकून कोरडा झालेला घसा ओला करण्याची संधी धुळवडीलाच मिळते. आम्ही खुश झालो. धुळवड तर धुळवड..आपले काय जाते मजा करायला ? मग धुळवडीला भल्या पहाटे उठलो. जास्तीत जास्त जुने कपडे घालून तयार झालो. त्या कपड्यात आम्ही काहीतरी ग्रेट दिसत असलो पाहिजे. कारण दोघातिघा भगिनींनी आम्हाला पाहून घरातून रात्रीची भाजीभाकरी आणली. पण आमच्या हातात भांडी, पिशवी न दिसल्याने हल्ली हे लोकही माजले आहेत असा कटाक्ष टाकून त्या निराशेने परत गेल्या.

आम्ही खुशीत चालत चालत कळमसरे गावाजवळ पोहचलो. तिथे खूप सार्‍या मांजरी एका रांगेत उभ्या होत्या. आम्ही चौकशी केली तर धुळवडीनिमित्त दूध डेअरीमधून फुकटात दूध वाटले जात असल्याची माहिती मिळाली. फुकट म्हटले की, आम्हाला दुप्पट जोर येतो. आम्ही रांग मोडून मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर चिडून मांजरींनी म्याव म्याव करुन फिसकारत मागे हाकलले. शेवटी रांगेत लागून आम्ही दुधापर्यंत पोहचलो. साक्षात व्हाईस चेअरमन किरणभाऊ दलाल दूध वाटत होते. त्यांनी आम्हाला ओळखून, तेच म्हटलं अजून कसे रांगेत लागला नाहीत असा डायलॉग ऐकवला. आम्हीही त्यांचीच स्टाईल पकडून आम्हाला ऐकूच आले नाही असे दाखवले. दुधाचा रंग हिरवागार होता. आम्हाला लगेचच शंका आली. त्यांना विचारले तर त्यांनी दबक्या आवाजात सांगितले की, शासनाने एकाच वेळी हरित क्रांती आणि दुग्ध क्रांती जाहीर केली. नजरचुकीने हरित क्रांतीचे मटेरिअल डेअरीला आणि डेअरीचे मटेरिअल कृषी विभागाला पोहचवले गेले. आता झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून कोणीही बोंबाबोंब न करताच मटेरिअल वापरुन घेतले. त्यामुळे दुधाचा रंग हिरवा झाला आणि पिके पांढरी पडली आहेत. दूध फुकट असल्याने आम्ही फारशी विचारणा न करताच दोन लिटरचा जग घशात रिकामा केला.

दूध प्यालो नि चमत्कार घडला. आम्ही चक्क हवेत तरंगत आहोत असा भास होऊ लागला. दुपारच्या उन्हात अरूणावतीच्या वाळवंटातून येणार्‍या थंडगार लहरी अंगाला झोंबू लागल्या. हे काय घडतंय ते पाहण्यासाठी पुलावर आलो. तिथे आणखी मोठा चमत्कार झाला होता. सन्माननीय वाळू तस्करांनी दूरदृष्टीने सर्व वाळू उपसल्याने नदीखालील पाण्याचा प्रवाह जिवंत झाला होता. त्यामुळे थंड वारे वाहत होते. शिरपुरात जणू काश्मीरच अवतरले होते. वाळू तस्करांची दूरदृष्टी आणि त्यांच्याकडे सरसकट दुर्लक्ष करणार्‍या महसूल विभागाच्या महादूरदृष्टीला सलाम करुन आम्ही पुढे निघालो. टाईल्स आणि बांधकाम मटेरिअल विकणारे राजस्थानी बांधव आपल्या साहित्याचे मोफत वाटप करतांना दिसले. जे लोक साहित्य घेत नव्हते, त्यांच्या अंगात खिळे मारुन पार्सल नेण्याची सोय होती. ते राजस्थानी दातृत्व पाहून गहिवरत आम्ही पुढे सरकलो.

करवंद नाक्यावर भली जत्रा भरली होती. नाक्याच्या दोन्ही बाजूने मोठा जमाव होता. दोन्ही बाजूला हातात फुलाची चित्रे होती. आम्हीच खरे, आम्हीच खरे अशा घोषणा दिल्या जात होत्या. आम्ही त्या गर्दीत शिरलो. तिथे विचारल्यावर कळले की, जुनी पार्टी विरुद्ध नवी पार्टी असा वाद होता. आतापर्यंत दोन पक्षांचे तुकडे झाल्याचे पाहिले होते. आता आणखी हा तिसरा पक्ष फुटतो की काय अशा चिंतेने आम्ही कळवळलो. जुन्या पार्टीतल्या एकाला विचारले की तुम्ही जुने हे कशावरुन मानायचे ? तो म्हटला, आमचे फूल बघा, त्याला पाकळ्या जास्त आहेत. मग आम्ही नव्या पार्टीकडे गेलो. तिथे एकाने सांगितले की, आमच्या फुलाचा देठ जास्त हिरवा आहे. विशेष म्हणजे हाताचे चिन्ह घेऊन आलेले काहीजण गुपचूप नव्या पार्टीचे समर्थन करीत होते. त्यांना विचारले तर ते म्हटले की, आमचा हात मदतीला आहे, म्हणून नव्या पार्टीच्या कमळाचा देठ जास्त हिरवा आहे. घोषणा वाढल्या. तिथे फूल काय, फुलाची पाकळीही मिळणार नाही हे लक्षात आल्याने आम्ही सटकलो.

शिरपूर इतके सुधारलेले पाहून आमचा गहिवर दाटून आला. आता कशासाठी जगावे असा पारमार्थिक विचारही मनात येऊन गेला. परत निघालो, तर पुन्हा साक्षात किरणभाऊ डेअरी (स्वत:ची) जवळ उभे ! ते आमच्याकडे पाहून हसत होते. आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो. ते म्हटले, हिरव्या दुधाचा चमत्कार लक्षात आला ना ! आम्ही हरित क्रांतीची थाप मारली आणि तुम्हाला ती खरीच वाटली. आम्हीही मग त्यांच्यासारखेच हसलो आणि म्हणालो, भाऊ, आम्हाला कोणी थाप मारण्याची गरज नाही. कोणी काहीही बोलले तरी आम्हाला पटते. आता कशाचे काहीच वाटत नाही. आम्ही आणि आमच्यासारखी जनता आता सर्व सुखदु:खाच्या पलिकडे गेली आहे, कोडगी झाली आहे. तिला राग येत नाही, आनंद होत नाही. एका बधीर व्यवस्थेचे आम्ही घटक आहोत. कोणी, काही न पाजताही आम्हाला अनामिक नशा चढलेली असते. तिच्या तंद्रीतच आम्ही वावरत असतो आणि मतदानापुरतीची लोकशाही झिंदाबाद म्हणत असतो. 

या भागात फिरण्यात मजा नाही असे वाटल्याने आम्ही थेट जुन्या शिरपूरकडे वळलो. जुन्या देना बँक चौकात मोठी रांग होती. भंडारा असेल या आशेने आम्ही रांगेत लागलो. नंतर कळले की ती रांग मर्चंट बँकेच्या ठेवीदारांची होती. एरवी ही रांग बँकेत असते, आज बाहेर कशी याचा तपास केला. तेव्हा कळले की, मर्चंट बँकेतर्फे ठेवींचे वाटप सुरु आहे. रांग पुढे गेल्यावर दिसले की, मॅनेजरसाहेब एकेका ठेवीदाराची मानगूट धरुन बोल तुझे किती पैसे आहेत असे विचारुन त्याच्या खिशात पैसे कोंबत होते. काही ठेवीदार सद्गदित होऊन आम्हाला पैसे नकोत अशी विनंती करीत होते. त्यांना मर्चंट बँकेचे कर्मचारी दोन्ही हात धरुन ओढत आणत त्यांच्या खिशात पैसे ओतून वर खिसा शिवून परत पाठवत होते. बँकेत येऊन रोज दांगडो करणार्‍यांना तर ठेवींवर चक्र, गदा, शंख व्याज लावून पैसे परत करण्यात येत होते. दुसरीकडे थकबाकीदार मंडळी वसुली पथकाचे पाय धरुन आमचे कर्ज आधी भरुन घ्या असा आग्रह करीत होती. त्यासाठी जादा व्याज लावण्याचे आमिषही दाखवले जात होते. हे दृश्य पाहून बँकेचे सर्व सभासद, पदाधिकारी, आजी माजी संचालक यांच्या डोळ्यात आनंदाश्रू, कर्जाश्रू, व्याजाश्रू उभे राहिल्याचे दिसून आले.

आणखी बरेच काही डायलॉग आमच्या तोंडातून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. तेव्हढ्यात एक थंडगार लाट आमच्या शरीराला भिजवून गेली. देना बँक चौकात समुद्र कसा आला अशी विचारणा करु तेव्हढ्यातच खणखणीत शिव्यांनी आमचा उद्धार झाला. ढोसलायला फक्त निमित्त पाहिजे, म्हणजे धुळवड खेळायला जातो. रात्रीची उतरेल तर सकाळी जाग येईल ना…अशी रोजची विशेषणे ऐकून लक्षात आले की आपण अद्याप घरातच आहोत. शरमेने मग आमच्या तोंडावर लालेलाल रंग चढला तो चढलाच !

Last modified: March 28, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *