दोन कोटी उकळूनही घराचा ताबा नाही
संचालकांवर गुन्हा दाखल
शहापूर, दि. ३ (सा.वा.) लंच विथ सोनाक्षी सिन्हा, हेलिकॉप्टर राईड, एक रुपयात बुकिंग, कर्ज सुविधा अशी विविध प्रलोभने दाखवून भुरळ पाडून धसई येथे हाऊसिंग प्रकल्प साकारणाऱ्या कर्म इन्फ्रास्ट्रक्चरने शेकडो ग्राहकांची घोर फसवणूक केली आहे. पाच वर्षांपूर्वी पैसे घेऊनही ग्राहकांना घराचा ताबा मिळालेला नाही. ग्राहकांना दोन कोटींचा चुना लावणाऱ्या कर्म इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक नामदेव जाधव, केतन पटेल, रमाकांत जाधव, रामचंद्र काळे यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहापूर तालुक्यातील धसई येथे कर्म पंचतत्त्व, कर्म इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम व्यावसायिक कंपनीचा हजारो फ्लॅटचा हाऊसिंग प्रकल्प २०१५ पासून सुरू करण्यात आला होता. स्वस्तात घर मिळणार या उद्देशाने ठाणे, मुंबईतील अनेक ग्राहकांची सुरुवातीला घर घेण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांसह मजुरांचीदेखील बिले थकवण्यात आली. एलआयसी, बँका, फायनान्स कंपन्यांकडून ग्राहकांच्या नावावर कर्ज घेऊनही ताबा मिळत नसल्याने अखेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याची माहिती शहापूरचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी सांगितले.
असे लाटले पैसे
मुंबईचे मिलिंद बटावळे यांच्यासह २२ जणांनी या प्रकल्पात घरासाठी ग्रुप बुकिंग केले, मात्र कर्म इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांनी या सर्वांना चुना लावला. इमारतीचे बांधकाम सुरू न करताच या ग्राहकांच्या नावावर विविध बँका व फायनान्स कंपनीकडून दोन कोटी कर्ज मंजूर करून हे पैसे कंपनीच्या नावावर वर्ग करून घेतले. घराची एक वीटही रचलेली नसताना कर्जाचे ग्राहकांना भरावे लागत आहेत.
अशा प्रकारच्या स्कीम आपल्या गावात आपल्या तालुक्यात आपल्या घराजवळ सुरू असतील तर आपण सावध राहा अन्यथा आपले देखील अशा पद्धतीने फसवणूक होऊ शकते कारण सदर प्रकरण 2015 चे असून ग्राहकांच्या संयमाचा बांध आता फुटला त्यामुळे विविध प्रकारे प्रलोभन देऊन आपल्या कष्टाच्या पैशांवर ती कोणी मलई खात असेल तर वेळीच जागे व्हा