आज नाशिक ला 155 वर्ष पूर्ण झाले आज नाशिक चा वाढदिवस आहे
नासिक कलेक्टरेट आणि नासिक जिल्ह्याला २६ ऑक्टोबर रोजी १५५ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल सर्व नाशिककरांचे सर्व प्रथम हार्दिक अभिनंदन करतो 💐
नासिक हे मौर्य, सातवाहन, यादव, मोगल, मराठे ,निजाम आणि उत्तर मराठीशाहीतील पेशवे यांच्या कारकिर्दी मधील एक महत्त्वाचे शहर म्हणून नेहमीच गणले जात असे. नाशिक म्हणजे नाशक आणि खानदेशाला आशक असे हे नाव असल्याचे दिसून येते. प्रचंड मोठ्या डोंगराळ भाग आणि लांबवर पसरलेल्या कुरणांमुळे इतिहासामध्ये मोठमोठ्या लढाया या भागात झाल्याचे दिसून येते.
सुंदर वातावरणामुळे मोगलांनी याचे नाव गुलशनाबाद ठेवले होते.
१७५१ मधील भालकीच्या तहामधे नाशिक निजामाने मराठ्यांना द्यायचे ठरले होते मात्र ते हातात येत नव्हते, मधल्या काळात नानासाहेब पेशव्यांने चातुर्याने निजामाकडून नाशिकचा ताबा मिळवला. नाशिक ही पेशव्यांची उपराजधानी होती तर त्र्यंबकेश्वर चा किल्ला हे प्रमुख संरक्षक ठाणे होते. नासिकला नाशिक हे नाव या काळातच मिळाले.
ज्याच्या ताब्यात त्रंबकेश्वरचा किल्ला तो नाशिकचा मालक असा काहीसा समज त्या काळात होता. दुसरा बाजीराव पळपुटा हा पुण्याजवळील खडकीचे युद्ध हरल्यानंतर अठराशे अठरा साली इंग्रजांनी विना प्रतिकार नाशिक शहर जिंकून घेतले. कारण पेशव्यांचे सशस्त्र सैनिक हे सर्व त्र्यंबकेश्वरला आराम करण्यासाठी गेले होते.
इंग्रजांनी शहर ताब्यात घेतल्या वरती आपल्या पद्धतीने शहरात सुधारणा करण्यास सुरुवात केली.
जुन्या काळी नाशिक हे पंचवटी , सध्याचा मेन रोड पुरतेच मर्यादित होते . एक गलिच्छ, घाणेरडे, धार्मिक ठिकाण जेथे वारंवार साथीचे व रोग येत असत असा नाशिकचा नावलौकिक होता व तो मिटवायचा इंग्रजांनी बराच प्रयत्न केल्याचे दिसून येते. चांगल्या हवामानामुळे इंग्रजांनी नाशिकला देशाची राजधानी बनवायचा हे प्रयत्न केला मात्र तो सफल न झाल्याने तोफखाना केंद्र ,गोल्फ क्लब, डिस्टिलरी, नोट प्रेस इत्यादी महत्त्वाचे सरकारी उपक्रम नाशिकला आणायचा सफलता पूर्ण प्रयास केल्याचे दिसून येते.
तर माझ्याकडे उपलब्ध कागदपत्रांनुसार १८४२ बेल यांनी श्री आर डी लॉर्ड यांच्याकडून उपजिल्हाधिकारी या पदाचा ताब्यात असल्याचे दिसून येते तर १८४३साली श्री टेलर अहमदनगर जिल्हाधिकारी यांचे दुय्यम सहाय्यक आणि न्यायाधीश होते त्यांची वणी- दिंडोरी तालुक्याला उपजिल्हाधिकारी म्हणजेच सब कलेक्टर म्हणून बदली झाल्याचे आणि नाशिक तालुक्यावरून कार्यमुक्त केल्याची नोंद आढळते.
१८५५ साली नाशिक शहरातून महु पर्यंत टेलिग्राफ म्हणजेच तारेची लाईन गेल्याचे दिसून येते, तर पुढील काही वर्षांमध्येच सातपुड्यापर्यंत जी रेल्वे लाईन टाकली गेली यामध्येही नाशिक वरून रेल्वे जाईल अशी व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून येते.
त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या नगपालिकां नंतर १८६५ साली नाशिक म्युनिसिपालिटी म्हणजे नगर पालिका झाल्याचे दिसून येते. यामध्ये माझ्याकडे उपलब्ध कागदपत्रांनुसार श्री हॅवलोक यांचे आदेशाद्वारे ६ ऑगस्ट १८६५ रोजी श्री करशेटजी नुसर्वाणजी हे नासिक म्युनिसिपल कमिशनर झाल्याचे दिसते ,मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की ते नाशिक शहराचे पोलीस इन्स्पेक्टर ही होते.
पण या आधी नासिक पेक्षाही अहमदनगर जिथे इंग्रजांचा महत्त्वाचा सैनिकीतळ होता तेथून नासिकचे कामकाज बघितले जायचे. थोडक्यात सांगायचे तर अहमदनगर हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण होते तर नासिक हा तालुका होता .
नासिक चा एकंदरीत पसारा वाढत असतानाच अहमदनगर वरून सर्व कार्यभार सांभाळणे अवघड जात असल्याने तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये झालेल्या बैठकीनुसार दिनांक १० जुलै १८७९रोजी भडोच ,कुलाबा, सोलापूर सोबतच नासिक हे स्वतंत्र कलेक्टरेट म्हणजे जिल्हा झाल्याचे जाहीर करण्यात आले , मात्र नाशिक कलेक्टरेट हे न्यायालयीन कक्षा ठाणे ( Tanna) याच्याशी संलग्न असल्याचे दिसते. तर याच नोटिफिकेशन नुसार अकोला तालुका हा न्यायालयीन कामासाठी सिन्नरला जोडल्याचे व सिन्नर हे ठाणे न्यायक्षेत्राच्या अंतर्गत असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.
श्री आर सी ओवेन्स हे नाशिकचे पहिले जिल्हाधिकारी होते तर माझ्याकडे उपलब्ध कागदपत्रांनुसार श्री ए एच प्लंकेट, हुजूर डेप्युटी कलेक्टर यांनी २८ सप्टेंबर १८६९ रोजी नाशिकचा कार्यभार सांभाळल्याचे दिसते.
लेफ्टनंट डब्ल्यू सी ब्लॅक हे सुपरन्युमरी असिस्टंट सुपरीटेंडंट नासिक रिव्हिजन सर्वे या पदावर दिनांक १८ नोव्हेंबर १८६९रोजी नियुक्त झाल्याचे दिसते
यानंतर २६ जुलै १८६९ च्या शासन आदेशानुसार अहमदनगर आणि खानदेश जिल्ह्यांमधील काही तालुके नवीन झालेल्या नाशिक जिल्ह्यासाठी वर्ग करण्यात आले ते खालील प्रमाणे:- नासिक, सिन्नर, इगतपुरा , दिंडोरी, चांदोर ,निफाड, सावरगाव, अकोला आणि पेठ हे अहमदनगर मधील तालुके नाशिक तालुक्याला जोडण्यात आले. तर मालेगाव ,नांदगाव आणि बागलाण हे खानदेश मधील तालुके नाशिक कडे वळवण्यात आले.
एक लक्षात घ्या की पूर्वी त्रंबकेश्वर तालुका नव्हता,१९९६ मधे इगतपुरी आणि नाशिक तालुक्यातील काही भाग एकत्र करून त्रंबकेश्वर तालुका बनवण्यात आला. येवला इंग्रज काळात कधीतरी नंतर जोडण्यात आला , तर सावरगाव (गंगापूर धरणा जवळील जमिनीच्या गैरव्यवहारांसाठी प्रसिद्ध असलेले ) हे महत्त्वाचे गाव असल्याने त्याला पहिले तालुका बनवण्यात आले होते मात्र नंतर त्याचा तालुक्याचा हुद्दा काढून घेण्यात आला. बरीच वर्ष सांभाळ केल्यानंतर अकोला तालुका परत नगर जिल्ह्यास जोडण्यात आला. सुरगाणा हे राजे पवार देशमुख यांचे स्वतंत्र संस्थांनं होते जे १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर नाशिकचा एक तालुका म्हणून जोडले गेले
तत्कालीन कागदपत्रांनुसार नाशिकचे स्पेलिंग हे Nassick असे लिहिले जात असे प्रत्येक इंग्रज अधिकारी आपल्या उच्चारानुसार व सोयीनुसार लोकांची आणि गावांची नावे लिहीत असत यामुळे फार गोंधळ उडत असल्याने २० मार्च १८७९ रोजी मुंबई प्रांतातील सर्व गावांची नावे ही आदेश जारी करून नक्की करण्यात आली व यामध्ये Nassick हे Nasik झाले.
अशा पद्धतीने २६ ऑक्टोबर १८६९ च्या शासन आदेशानुसार नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेचा श्री गणेशा झाला.नाशिक १५५ वर्षाचं झाले आहे…
धार्मिक , सामाजिक , शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आघाडीवर असणारा नाशिक जिल्हा वर्धापन दिन चिरायु होवो समस्त नाशिककरांना जिल्हा वासियांना हार्दिक शुभेच्छा 💐
नाशिक मधे राहून नाशिक चा इतिहास माहिती नसलेल्या नी नक्की वाचा…
“असे हे नासिक…” ” विद्येच्या वाटेवर…”
- मराठेशाही संपुष्टात आली आणि नासिकच्या तीर्थक्षेत्र स्वरूपाबरोबर तिथे इतर अनेक बदल घडून आले.
- १८४० साली “सार्वजनिक वाचनालय” सुरू झाले.माझ्या आठवणी प्रमाणे ते सरकार वाड्याच्या मागील भागात होते.
- १८५४ साली धर्मांतर करून नव्याने ख्रिस्तधर्मात आलेल्या शरणार्थींसाठी “शरणपूर कॉलनी” निर्माण झाली.
- १८५७च्या उठावानंतर १८६१मध्ये देवळाली येथे सैन्यासाठी कायम तळ (कॅन्टोन्मेंट) निर्माण झाला.
१८६१मधे इंग्रजांनी ‘ॲग्लो व्हर्नाक्युलर स्कूल’ सुरू केले. - १८६२ला नासिक रोड रेल्वे स्टेशन झाले.
- १८६४-नासिक म्युनिसिपालटीची स्थापना.
- १८६९-नासिक जिल्हा स्थापना.
- १८९४-नासिक व पंचवटीस जोडणारा बारमाही पूल “व्हिक्टोरिया पुलाची” निर्मिती.
- १८९६ स्थानिक टिळकवादी मंडळींनी “शिवाजी विद्यालयाची” स्थापना केली.
- १९१०- पोलिस अधिकारी प्रशिक्षण संस्था,(PTC)
- १९२२- सैन्यातील व पोलिस अधिका-यांच्या सोयीसाठी नासिक रोड येथे “आर्टिलरी”निर्माण झाली.
- १९२७- नासिक रोडला “सिक्युरिटी प्रेस” सुरू झाला.
- १९४१- क्वेट्टा (पाकिस्तान) येथून तोफखाना दलाचे मुख्यालय हटवून “देवळाली” येथे स्थलांतरित झाले.
नासिक मधील ब्रिटिश कालीन चार वास्तू नासिकची शान वाढवणा-या आहेत. नासिकमधे प्रवेश करताच जुन्या मुंबई-आग्रा रोड वरील कोर्टाची दगडी इमारत,त्यास लागूनच कचेरी म्हणजे कलेक्टर ऑफिसची दगडी इमारत. जुळ्या भावंडांसारख्या त्या उभ्या आहेत.आणि त्यांच्या समोर त्यांची बहीण शोभणारी सरकारी मुलींची शाळा. करड्या रंगाचे दगडी चिरे वापरून बांधलेल्या ह्या व्हिक्टोरियन स्टाईल वास्तू आज शंभर वर्षानंतर सुध्दा लोकांचे लक्ष वेधून घेतात नासिककरांच्या आठवणीतली ‘ग ग स्कूल'(गर्विष्ठ गर्ल्स स्कूल की गव्हर्न्मेंट गर्विष्ठ ?) ही शाळेची इमारत १९२०साली उभारली आहे.
पहिली काही वर्षे ती शाळा मुली व मुलांसाठी एकत्र असावी.शाळा कधी स्थापन झाली,आधी कुठे भरत असे? या विषयी माहिती मिळाली नाही. तिचे नावही बहुधा नाशिक हायस्कूल असावे.(जाणकारांनी माहितीत भर घातल्यास बरे होईल.)पुढे ती फक्त मुलींसाठी झाली.स्त्री शिक्षणाचे महत्व पटल्याचे हे चिन्ह आहे. शाळेला एक समृद्ध, राष्ट्रवादी भूमिका असणा-या मुख्याध्यापिकांची परंपरा लाभली आहे.
गोष्ट आहे सन १९२०-१९२१ ची. नव्याने आलेल्या मुख्याध्यापिका श्रीमती सीताबाई भागवत यांची. म्हणजे दुर्गाबाई भागवत यांची आत्या. दुर्गाबाईंच्या आईचे निधन झाले आणि दुर्गा व कमला या दोघी बहिणी आत्याकडे नासिकला राहावयास आल्या. त्यांच्या ” प्रासंगिका ” ह्या संग्रहात त्यांनी लहानपणच्या आठवणी लिहिल्या आहेत. नासिक हायस्कूलबद्दल, तेथील उटगीकर,नेने इ.शिक्षकांबद्दल खूपशी माहिती वाचायला मिळते. तेव्हाचे नासिकचे समाज जीवन, समाज धारणा कशा होत्या? हे कळते. कटू व चांगल्या दोन्ही अनुभवांची वर्णने त्यात वाचायला मिळतात. राष्ट्रवादी विचार असणा-या, गांधीवादी सीताबाई भागवतांची सरकारी नोकरीमुळे कशी घालमेल होत होती,द्विधा मनस्थिती होत असे याची कल्पना येते. वानगीदाखल एक उदाहरण दिले तर वावगे ठरू नये.
दुर्गाबाईं लिहितात “स्काऊट ही संस्था जुनी झाली होती. पण गर्ल गाईड १९२३ नंतर निघाली असावी, निदान नाशिक नगरच्या नव्याने काढलेल्या मुलींच्या शाळांत गर्ल गाईड सुरू करण्याची कल्पना आमच्या डोळ्यांदेखत सुरू झाली. प्रथम शिक्षकांना ट्रेनिंग देण्यात आले. माझ्या आत्याला त्या कॅम्पला जावे लागले. ती परत आली ती उदास होऊनच. शाळेत वर्ष उलटायला आले तरी तिने गर्ल गाईड सुरू केले नाही. इन्स्पेक्टरने जाब विचारला त्यावर तिने उत्तर दिले की, ‘गर्ल गाईड ची शपथ घेताना मुलींना मला असत्य शिकवणं प्राप्त होईल, आणि ते मला नकोय.’
इन्स्पेक्टरने चमकून विचारले ‘कुठले असत्य?’
आत्या म्हणाली ‘मी माझ्या राजाशी व देशाशी इमानी राहीन’ अशी शपथ घ्यावी लागते. ब्रिटनमध्ये ही शपथ ठीक आहे. पण हिंदुस्थान सारख्या देशात एक तर माणसाला राजाशी तरी एकनिष्ठ राहता येईल किंवा देशाशी. दोघांशी एकनिष्ठ राहता येणार नाही. म्हणून जी शपथ मोडण्यासाठीच आहे ती मी मुलींना कशी घ्यायला लावू ?”
हे उत्तर ऐकल्यावर सरकारी गोटात फार क्षोभ माजला.त्याचा व्हायचा तो परिणाम झाला.त्यांच्या सेवेतील ज्येष्ठतेवर प्रतिबंध घातला गेला.
दुर्गाबाई भागवत व कमल सोहोनी या दोघी नामवंत महिला या नाशिक हायस्कूलच्या विद्यार्थिनी. दुर्गाबाई मॅट्रिक याच शाळेतून झाल्या.
पुढे काही वर्षांनी अशाच दोन विद्यार्थिनी त्यांच्या मुख्याध्यापक आई समवेत या शाळेत आल्या.
सुधाताई अत्रे (आचार्य अत्रे यांच्या पत्नी) आपल्या दोन्ही कन्यांना म्हणजे, शिरीष पै व मीना देशपांडे यांना घेऊन नासिकला आल्या. शिरीष पै यांनी लिहिलेल्या ” वडिलांच्या सेवेसी” ह्या पुस्तकात “आई” ह्या लेखात नासिक,मुलींचीशाळा ह्यांच्या मजेशीर आठवणी वाचायला मिळतात.
तसेच लक्ष्मीबाई टिळक यांच्या “स्मृतिचित्रे” मध्ये तर संपूर्ण नासिकचा परिसर,त्या काळातील तेथील कौटुंबिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक घडामोडींचे चित्रण वाचायला मिळते.
कोणतेही औपचारिक शालेय शिक्षण न घेता अनुकूल परिस्थितीने मन कसे सुसंस्कृत होऊ शकते ह्याचे लक्ष्मीबाई टिळक हे आदर्श उदाहरण.हे अलौकिक व्यक्तिमत्व नासिकचेच!
स्त्री शिक्षणास वाहून घेतलेल्या, नावाजलेल्या,अशा “गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल” ह्या आदर्श शाळेचा लौकिक पुढे अनेक वर्षे टिकून ठेवण्यात मुख्याध्यापिका आशाताई राजदेरकर यांचे फार मोठे योगदान होते ते विसरता येणार नाही.
आशाताई राजदेरकर ह्या सुध्दा आमच्या वकील वाडीतील रहिवासी होत्या याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो!
१८६१ मधे अस्तित्वात असलेली ‘अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल’, १८७८मधे अस्तित्वात असलेली. नासिक हायस्कूल (स्मृतिचित्रे उल्लेख), पंचवटीत १८८२ मधे सुरू केलेली इंग्रजी शाळा(उल्लेख–स्मृतिचित्रे) व रानडे, जोशी, विद्वांस मंडळींनी
स्थापन केलेले १८९६ मध्ये अस्तित्वात असलेले ‘शिवाजी विद्यालय’ (बाबाराव सावरकर चरित्र) या सर्व शाळांचे पुढे काय झाले याचा तपशील मला उपलब्ध झाला नाही.जाणकारांनी जरूर भर घालावी.
नासिकची शैक्षणिक क्षेत्रात मजल दर मजल करत प्रगती सुरू झाली.
१९१८साली न्यू इंग्लिश स्कूल नावाने आजचे ‘जु. स. रूंगटा हायस्कूल’ सुरू झाले.
पुढे १९२२ साली ‘पेठे हायस्कूल’ सुरू झाले. आज १००वर्षाच्या ह्या तिन्ही जुन्या संस्था नासिकच्या शिक्षणक्षेत्रात काम करत आहेत.
१९२४ मधे “गोखले एज्युकेशन सोसायटीचे HPT कॉलेज सुरू झाले. त्यांनीच पुढे १९४८साली RYK सायन्स , १९५७ मधे BYK कॉमर्स व १९६८मधे बिटको कॉलेज ऑफ मॅनेजमेंट हे पुणे विद्यापीठात प्रथमच मॅनेजमेंट कॉलेज सुरू केले.
नासिक ची हवा सुखद, पाणी मुबलक त्यामुळे १९२५मधे ‘बार्न्स स्कूल’,१९३५ ‘भोसला मिलिटरी स्कूल व १९४०ला “बॉईज टाऊन’ ह्या रेसिडेन्शिअल स्कूल्स सुरू झाल्या.
येथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते,
भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना डॉ मुंजे यांनी केली.नासिकची पसंती झाल्यावर सरकारकडे जागा मिळावी म्हणून अर्ज केला.पण कार्यवाहीस विलंब होत होता. त्या वेळी नासिकच्या कलेक्टरचा नवीन बंगला बांधून झाल्याने जुना प्रशस्त बंगला, तबेला,नोकरांसाठी आऊटहाऊस इ.सोयी असणारा बंगला रिकामा झाला.ह्या बंगल्याची मालकी श्री पुरुषोत्तम (बाळासाहेब) वैशंपायन यांच्या कडे होती. बाळासाहेब टिळक, सावरकर भक्त – त्यांनी आपला बंगला १९३५ साली डॉ मुंजेंना शाळेसाठी वापरायला दिला. पुढे १९३७ साली सरकारने शाळेला जमीन देऊ केली.१९३७ साली विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे शाळा बाळासाहेब वैशंपायन यांच्या बंगल्यातून सुरगाणा स्टेटचे महाराज पवार यांच्या वास्तूत काही काळ होती.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची परंपरा उज्वल आहे.भारतीय लष्करात उच्च पदावर पोचले आहेत. त्यातील काही: लेफ्टनंट जनरल डॉ एम् एल् छिबर, लेफ्टनंट जनरल सरदेसाई, लेफ्टनंट जनरल सहस्रबुद्धे,एअर मार्शल अजित भोसले, डॉ श्रीकांत जिचकार इ.
तसेच बार्न्स स्कूलचे माजी विद्यार्थी- दिलीप कुमार, विनोद खन्ना,अर्शद वारसी, एअर मार्शल अनिल टिपणीस व सध्याचे चिफ ऑफ नेव्ही करमबीर सिंग अशी मांदियाळी आहे.
बॉईज टाऊन’: पद्मभूषण हफीज कॉन्ट्रॅक्टर (आर्किटेक्ट), रुसी तल्यारखान(NASA program manager), स्क्वाॅड्रन लिडर परवेझ जमासजी- वीर चक्र, लेफ्टनंट कर्नल प्रकाश किटकुले- वीर चक्र, कमांडर एच् बी कवीना -वीर चक्र,
नरी कॉन्ट्रॅक्टर-क्रिकेट.
आज नासिक हे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शैक्षणिक केंद्र बनले आहे.
“यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, तसेच आरोग्य विद्यापीठ” आल्याने नासिकचे शैक्षणिक महत्व अधिक वाढले आहे.
१९२१/२२मधे नासिक मधील सनातनी मंडळींनी सीताबाई भागवत यांच्यासकट त्यांच्या कुटुंबीयांवर सुधारक व त्यातही अविवाहित म्हणून सतत संशय व नाराजी व्यक्त करत बहिष्कार टाकण्यासाठी नासिकच्या कुर्तकोटी शंकराचार्यांकडे अर्ज केला होता.कुर्तकोटींनी त्यास नकार दिला होता. पण नासिककरांच्या त्यावेळच्या मनःस्थितीवर,विचारांवर हा प्रसंग प्रकाश टाकतो.
एक तपानंतर त्याच नासिककरांनी १९३५ साली लक्ष्मीबाई टिळकांना *” साहित्य लक्ष्मी”* पुरस्कार देउन सत्कार केला. त्या प्रसंगी आचार्य अत्रे म्हणाले,- “आजचा हा सत्कार समारंभ महाराष्ट्राला आदर्श आणि संस्मरणीय असा आहे. नाशिक म्हणजे सनातन धर्माचा बालेकिल्ला. अशा *या सनातन धर्माच्या* बालेकिल्ल्यात बाह्यदृष्ट्या परधर्मीय समजल्या जाणाऱ्या एका साहित्य सेविकेचा सत्कार करून, साहित्यक्षेत्रांत, शारदेच्या मंदिरात, जातिभेद, धर्मभेद, पंथभेद नाहीत, असे आज नाशिककरांनी जाहीर केले आहे. धर्मभेदाच्या अस्थी नाशिककरांनी आपल्या प्रेमाच्या गोदावरीच्या डोहांत टाकून दिल्या असे या समारंभाने सिद्ध केले आहे”
नासिकचा “विद्येच्या वाटेवरील” हा प्रवास नक्कीच लोभस आहे.