नाशिक : डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी व्यापक आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश–विदेशातून मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी नाशिक विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर (नाशिक ग्रामीण), पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण (नाशिक शहर), श्रीमती नयना आगलावे (वाचक) तसेच नियोजन विभागाचे सहसंचालक योगेंद्र चौधरी, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते, तर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे (धुळे), महेश्वर रेड्डी (जळगाव), श्रवण दत्त (नंदुरबार), अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे (अहिल्यानगर) हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते.

🔹 महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचे निर्देश
डॉ. गोऱ्हे यांनी खालील उपाययोजना करण्याचे निर्देश दिले:
महिलांसाठी स्वतंत्र मदत केंद्रे व हिरकणी कक्ष स्थापन करणे
स्वच्छता गृहांची पुरेशी सुविधा उपलब्ध करणे
दिव्यांग महिला भाविकांसाठी विशेष व्यवस्था
तालुका व जिल्हास्तरावर भरोसा सेल कार्यान्वित ठेवणे
कौटुंबिक संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
पोक्सो प्रकरणांतील पीडितांचे समुपदेशन
रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय
शालेय बस व रिक्षांची नियमित तपासणी
महिला अत्याचार प्रकरणांत दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी सखोल तपास
🔹 अमली पदार्थ प्रतिबंधासाठी विशेष मोहिम
विशेष पोलिस महानिरीक्षकांनी सांगितले की, विभागातील पाचही जिल्ह्यांत महिला अत्याचार रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. अमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी ड्रोनच्या साहाय्याने कारवाई करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहकार्याने सर्वसमावेशक नियोजन केले जात आहे.
संदीप धात्रक, सहाय्यक संपादक मो. 9420000942
