नाशिक – पोलिस आयुक्तालय, नाशिक शहरातील पर्यटन मोबाईल पथकातील तीन पोलीस अंमलदारांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका पाच महिन्यांच्या गरोदर महिलेला वेळेत मदत मिळून तिचा व तिच्या गर्भातील बाळाचा जीव वाचला. या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी के.टी.एच.एम. कॉलेज, नाशिकच्या गेटबाहेर पर्यटन मोबाईल पथक ड्यूटीवर असताना एक स्कूटी (क्र. एमएच १५ एफएल ०३५२) वरून एक गरोदर महिला व तिचा भाऊ जात असताना अचानक महिलेला चक्कर आल्याने ती रस्त्यावर पडली. ती थेट पोटावर पडल्याने तिला तीव्र वेदना सुरू झाल्या.
त्यावेळी ड्युटीकामी असलेले पोहवा दिपक अभिमन चव्हाण (नियंत्रण कक्ष, नाशिक शहर), मपोअं वैशाली प्रदिप गिते (पोलीस मुख्यालय, नाशिक शहर) आणि चापोअं नामदेव पांडुरंग भोये (मो.प. विभाग, नाशिक शहर) हे तात्काळ धावून घटनास्थळी पोहोचले. कोणतीही दिरंगाई न करता त्यांनी महिलेला पर्यटन मोबाईलमध्ये बसवून तातडीने डॉ. वडगांवकर यांच्या रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ही महिला व तिचे बाळ दोघेही सुरक्षित असल्याचे सांगितले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे गंभीर दुर्घटना टळली.
या अंमलदारांच्या तत्परता, जागरूकता आणि मानवतावादी भूमिकेमुळे त्यांची सर्वत्र प्रशंसा होत असून पोलिस दलाच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.
पोलिस टुडे चा पोलीस सौहार्दभावनेला सलाम
संदिप धात्रक 9420000942
अतिथी संपादक
