
!!आदर्श समाजनिर्मितीचा बीजांकुर !!
समाजविकासाच्या दीर्घ इतिहासात एक गोष्ट स्पष्ट दिसून येते; गुन्हेगारी ही केवळ कायद्याची समस्या नसून ती मूल्यहानीची प्रक्रिया आहे.मूल्यांचा प्रकाश जिथे कमी होतो, तिथे गुन्ह्यांची सावली वाढते; आणि मूल्यांची पायाभरणी मजबूत असेल, तर गुन्हेगारीला अंकुरण्याची संधीही मिळत नाही.
मुलांचे बालपण हे केवळ त्यांच्या आयुष्याचे पहिले पान नसते, ते राष्ट्राच्या भविष्याचे पहिले अक्षर असते.
बालसंस्कार : उज्ज्वल समाजाचे आधारबीज*
बालपणीचे अनुभव, कुटुंबातील वातावरण आणि समाजाची दृष्टी—हे तीन घटक मुलांच्या मनावर अमिट छाप सोडतात.पहिली ०–७ वर्षे ही नैतिक विचारक्षमता, सहानुभूती, शिस्त आणि स्वसंयम घडवणारी असतात.या काळात संस्कारांची बीजे पेरली गेली तर पुढील आयुष्याची दिशा सहज उजळते.
“बालपणाच्या मातीमध्ये, बीज एक संस्काराचे,
जोपासले की उमलते, रूप राष्ट्राच्या आधाराचे.
गुन्हेगारी आणि बालपणातील संबंध :
अनेक अपराधांचे मूळ हे तात्कालिक नसते; ते बालपणातील अस्थैर्य, चुकीचे अनुकरण, तुटलेली भावनिक बांधणी,
आवेगावर नियंत्रण नसणे, आणि चुकीच्या प्रभावांमध्ये रुजलेले असते.
याउलट योग्य संस्कार मुलांना विचारपूर्वक निर्णय,भावनांवर संयम, सहानुभूती,सामाजिक जबाबदारी,
प्रलोभनांना नकार देण्याची क्षमता ही गुणवैशिष्ट्ये देतात.हिच गोडी पुढे जाऊन गुन्हेगारीविरुद्ध संरक्षणकवच बनते
“बालपणी शिकविले, संस्काराचे दान,
जगी गुन्हे न रुजती, होते मनोमन् महान.”
असंस्कारित विकासाचे आधुनिक संकट :
आजच्या डिजिटल युगात मुलांचे अनुभवविश्व झपाट्याने बदलले आहे.
मोबाईल व्यसन, हिंसक मजकूर, तुटलेले कौटुंबिक संवाद, अति स्पर्धा आणि एकाकीपणा हे सर्व घटक मुलांच्या भावनिक आरोग्यावर परिणाम करतात.या पार्श्वभूमीवर बालसंस्कार हा विषय केवळ सांस्कृतिक विधी नसून राष्ट्रीय सामाजिक स्थैर्याचा मूलभूत आधार ठरतो.
गुन्हेगारीमुक्त समाजाचा आराखडा : बालसंस्कारांवर आधारित दिशादर्शक तत्त्वे*
१) कुटुंबकेंद्रित संस्कार
कुटुंब हे बालकाचे पहिले आणि सर्वात प्रभावी विद्यापीठ आहे. पालकांचा वर्तनस्वर, भाषा, निर्णयप्रक्रिया—हेच मुलांचे आदर्श बनतात. कुटुंबातील शांतता, प्रेम आणि शिस्त या समाजनिर्मितीच्या पहिल्या वीटा आहेत.
२) शाळांची सकारात्मक भूमिका
शाळा केवळ ज्ञान देण्यापुरती मर्यादित नाही. ती व्यवहार, मूल्ये, सहकार्य, शिस्त आणि सामाजिकतेचा सराव देणारे मंच आहे.अभ्यासाबरोबरच मूल्याधिष्ठित उपक्रम गुन्हेमुक्त समाजासाठी मजबुत पाया घालतात.
३) तंत्रज्ञानाचे संयमी शिक्षण
“मोबाईल कसा वापरावा?” यापेक्षा “कधी वापरू नये?” हे मुलांना शिकवणे अधिक महत्त्वाचे आहे.डीजिटल साक्षरता म्हणजे केवळ कौशल्य नव्हे; ती एक मूल्यदृष्टि आहे.
४) कला, खेळ, वाचन आणि सेवा : चार आधारस्तंभ
या चार गोष्टी मुलांत
आत्मविश्वास,सहानुभूती,सामाजिक बांधिलकी,सकारात्मक उर्जा निर्माण करतात. चांगल्या सवयी गुन्हेगारीच्या विरुद्ध दिशेने वाटचाल घडवतात.
५) अध्यात्माचा अंतर्मुख आधार
अध्यात्म मुलांना शांतता, विवेक आणि आत्मसंयम यांची दिशा देते.
हितोपदेशातील प्रसिद्ध ओळी याचेच सार सांगतात—
“विद्या ददाति विनयं, विनयाद् याति पात्रता…”
ज्ञानातून विनय, विनयातून पात्रता, आणि पात्रतेतून कल्याण.अध्यात्मिक संस्कार असलेले बालक भविष्यात समाजासाठी दीपस्तंभ बनते.
गुन्हेगारीमुक्त राष्ट्राची गुरुकिल्ली :
गुन्हेगारी हा प्रौढपणी दिसणारा परिणाम असतो; त्याची कारणे मात्र बालपणातील अनुभवांमध्ये लपलेली असतात.
“ छोट्या पावलांतून येते, भवितव्याची चाहूल,
संस्कारांची सावली जिथे, तिथे अपराधांना भूल.”
एक सुजाण बालक भविष्यात सजग नागरिक बनतो,
सजग नागरिक समाजाला घडवतो,
आणि सुसंस्कृत समाज गुन्हेमुक्त राष्ट्राची निर्मिती करतो.
हा मार्ग धीमा असला तरी परिणाम शाश्वत आहे.
कारण संस्कारांची ताकद बंदुकीच्या आवाजापेक्षा जास्त आणि दीर्घकालीन असते.
लेखक,
दास संन्यासी
