“हे कसले शिक्षण , हे तर आर्थिक शोषण !”

“हे कसले शिक्षण , हे तर आर्थिक शोषण !”

शाळा सोडल्याया दाखल्यांच्या नावाखाली अवाजवी शुल्क! ; शाळांकडून पैशांची शंभर पट लूट.

नाशिक / राजू ठाकरे : आडगाव येथील मनपा शाळा व इंग्लिश स्कूल येथे LC (स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेट) घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून चक्क ₹५०५ इतके शुल्क आकारले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात ही प्रक्रिया ₹०५ ते ₹१० रुपयांत पूर्ण होऊ शकते, पण शाळा “विद्यार्थी निधी”च्या नावाखाली भरमसाट असे शंभरपट पैसे गोळा करीत आहे. यामुळे अनेक पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शालेय शिक्षण संपल्यानंतर शाळा सोडताना LC (Leaving Certificate) मिळवणे प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. हे प्रमाणपत्र पुढील शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सामान्यपणे ही प्रक्रिया अत्यल्प खर्चात म्हणजे ₹०५ ते ₹१० मध्ये शाळेकडून केली जाते. मात्र, आडगाव येथील इंग्लिश स्कूल व मनपाच्या शाळेतून LC मिळवण्यासाठी चक्क ₹५०५ आकारले जात असल्याचे उघड झाले आहे.

या पैशांची मागणी शाळा सोडल्याच्या दाखल्यांच्या कारणासाठी असली तरी प्रत्यक्षात पावती देतांना मात्र हे अवाजवी शुल्क विद्यार्थी निधी या नावाने वर्ग केले जात असून, त्यामागे कोणतेही स्पष्ट कारण किंवा पूर्वकल्पना देण्यात येत नाही. विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून शाळा सोडताना LC साठी शुल्क भरावं लागणं, तेही शंभरपट इतकं अवाजवी, हे अनेकांना धक्कादायक वाटत आहे.

😡 पालकांच्या भावना : “हे कसले शिक्षण, हे तर आर्थिक, शोषण आहे!”

प्रतिक्रिया :

– आधीच महागाई! यात ॲडमिशन, डोनेशन, शालेय फी, वह्या, पुस्तके, रिक्षा किंवा बसभाडे , गणवेश, बुट, दप्तर, क्लासेस या सगळ्यांमध्ये खूप पैसे खर्च होतात. आता शेवटी शाळा सोडताना LC साठीही पैसे? आणि तेही चक्क खाजगीसह मनपाच्याही शाळेत ? या प्रकाराला आळा घालावा.

– एस.आर. नागरे, पालक

– शाळा LC देण्यासाठी ₹५०५ मागतेय आणि दोन पावत्या प्रदान करते, यातील एक LC साठी रुपये ०५ आकारल्याची व दुसरी पावती मिळते ती ‘विद्यार्थी निधी’ या नावाखाली चक्क रुपये ५०० अशी. पालकांना पैसे आकारणी अगोदर विद्यार्थी निधीबाबत कुठलीही पूर्वकल्पना दिली जात नाही किंवा संमती देखील घेतली जात नाही. वास्तविक पाहता शिक्षण वर्ष संपलंय, मुलं शाळा सोडत आहेत मग छुप्या पद्धतीने विद्यार्थी निधीला सक्ती का? विद्यार्थी पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी व अशा शाळांवर कारवाई करावी.

– वैभव ठाकरे, जिल्हाप्रमुख, भा.वि.सेना

📢 शिक्षण विभागाच्या नियमांचा भंग?

शिक्षण विभागाच्या नियमांनुसार, शाळा कोणत्याही विद्यार्थ्याकडून LC साठी अवाजवी शुल्क आकारू शकत नाही. विद्यार्थ्यांची मूलभूत कागदपत्रे त्यांच्या मागणीवर सहज आणि नाममात्र दरात उपलब्ध करून देणे ही शाळेची जबाबदारी आहे.

या प्रकरणात शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांना धाब्यावर बसवले जात आहे, असा आरोप पालक करत आहेत. विद्यार्थी निधी हा शिक्षण कालावधीत वापरण्यासाठी असतो, LC प्रमाणपत्र मिळवताना त्यासाठी शुल्क आकारणे हे अन्यायकारक असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मागणी : शासनाने त्वरित चौकशी करावी!

स्थानिक पालक समित्या आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्यातून मागणी होत आहे की, शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून शाळेकडून हे शुल्क का आकारले जात आहे याचा हिशेब मागावा.

जर ही रक्कम कोणत्याही शासकीय परिपत्रक किंवा शासकीय नियमाशिवाय घेतली जात असेल, तर ती परत केली जावी आणि संबंधित शाळेवर दंडात्मक कारवाई केली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.

🛑 “विद्यार्थी निधी” नावाखाली आर्थिक शोषण थांबवा!

शिक्षण हे हक्काचे असताना त्याचे व्यापात रूपांतर करणे ही चिंतेची बाब आहे. LC साठी अशा प्रकारचे शुल्क आकारणे ही शैक्षणिक क्षेत्रातील वाढती असंवेदनशीलता दर्शवते.

🔻 मुख्य मुद्दे:

LC साठी प्रत्यक्ष खर्च ₹०५ / -₹१० असताना ₹५०५ शुल्क.

“विद्यार्थी निधी”च्या नावाखाली शंभरपट पैसे घेतले जात आहेत.

पालकांतून संताप व्यक्त करीत शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी केली जात आहे.

राजू ठाकरे : 9921020111

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!