” महापालिका गायब, खड्डे हजर – मखमलाबाद रस्त्यांची चाळण “
नागरिकांचा जीव मुठीत घेऊन रस्त्यांवरून प्रवास ; त्वरित डागडुजीची मागणी.
नाशिक / राजू ठाकरे : पंचवटीतील मखमलाबाद परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, रस्ते अक्षरशः खड्ड्यांनी भरले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक यांसह मोठ्या प्रमाणावर आर्थिक त्रास सहन करावा लागत असून, नियमित कर भरूनही होत असलेल्या गैरसोयीमुळे वाहनचालकांमध्ये मनपाच्या गलथान कारभाराविषयी संतापाची लाट उसळली आहे. खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहनचालकांना पाठीच्या मणक्याचे विकार जडत असून, खड्ड्यांमुळे वाहन चालवितांना रात्रीसह दिवसा देखील अपघातांचा धोका वाढला आहे.

हे मार्ग ठरत आहेत नागरिकांसाठी डोकेदुखी :
– आदित्य रेसिडेन्सी, साई दीप रो हाऊसेस, गजानन पार्क, रामकृष्ण नगर परिसर, श्री गणेश अपार्टमेंट, ओम नगर यासह शांती नगर बस स्टॉप.
– मखमलाबाद नाका, ड्रीम कॅसल सिग्नल, लीलावती हॉस्पिटल, तांबे मळा, शांती नगर, रामकृष्ण नगर ते मखमलाबाद गाव परिसर.
– मखमलाबाद गाव, बँक ऑफ महाराष्ट्र, पै. ढाकणे सर्विस स्टेशन, बोरगड चौफुली, राऊ हॉटेल चौक ते म्हसरूळ गाव मार्गे पगारे वस्ती, धात्रक वस्तीसह हॉटेल जुगनू आडगाव
या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालकांना खड्ड्यांतून वाट काढने जिकिरीचे ठरत असून दुचाकीसह चारचाकी वाहनांच्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्त्यावरील खड्यांच्या चाळण मुळे वृद्ध व महिला प्रवाशांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष?
गेल्या काही वर्षांपासून महापालिका निवडणुका न झाल्याने लोकप्रतिनिधींची कमतरता नागरिकांना जाणवत आहे. निवडणुका लवकरच होणार असल्या तरीही सध्यातरी मनपा मध्ये अधिकारी राज सुरू असून, नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.—
नागरिकांची संतप्त मागणी:
रस्त्यांची तातडीने डागडुजी करून मानवी शरीराची / हाडांची होणारी झीज / हानी थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया:
“अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पूर्वी स्थानिक नागरिकांचा नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधींशी नियमित संपर्क असायचा. मात्र गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिक नियमित मनपास कर भरून सहकार्य करीत असतात त्यामुळे अधिकाऱ्यांनीही नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.”
— गोपाल भगुरे, सामाजिक कार्यकर्ते
प्रशासनाकडून आश्वासन:
आदित्य रेसिडेन्सी भागातील काही सुज्ञ नागरिकांनी खड्ड्यांबाबत तक्रारी केल्यानंतर, सामाजिक कार्यकर्ते धनंजय उर्फ पप्पू माने यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने खड्डे बुजविण्याची विनंती केली.
“येत्या चार-पाच दिवसांत रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातील,” असे अधिकाऱ्यांनी आश्वस्त केले आहे, अशी माहिती नगरसेविका प्रियांका माने यांनी दिली.
राजू ठाकरे – 9921020111
